Thursday, January 6, 2011

बोलगाणे - अळी आणि फुलपाखरु

आई बघ गं झाडावरती असे काय दिसते?

हिरवी हिरवी अळी बघ ना पान कसे खाते!
सांगना मला बसली कैसी, ती पानावरती,
पंखही नाही तरी कशी गं उडून आली ती?

'अशी कशी ले' उडून येईल ती पानावरती?
बस इथे मी तुला सांगते कुठून आली ती

गोड गोजिरे फुलपाखरु एक दिवस आले
पानावरती अंडे घालून भुर्र उडून गेले
अंड्यामधे छोटीशी ही अळीच बसलेली
एके दिवशी अंडे फोडून बाहेर ती आली

अशीच पाने खाऊन आता मोठी ती होईल,
मोठी होता कोष विणून ती आत बसून राहील
कोषामधल्या सुरवंटाचे रुप असे बदलेल,
सुंदरसे बघ फुलपाखरु बनुनी तेची उडेल


असे आहे का गुपीत आई फुलपाखराचे!
ऐटीत सांगेन सर्वांना मी मला समजले जे

गोष्ट लाकूडतोड्याची

ऐक बाळा तुला सांगते एक कहाणी खरी
लाकडं तोडण्या लाकूडतोड्याची निघाली की स्वारी


लोखंडाच्या कुर्‍हाडीने तो झाड लागला तोडू
पाण्यात पडली कुर्‍हाड आणि आले त्याला रडू


ऐकून त्याचे रडणे बाहेर जलदेवी ती आली
झालं तरी काय अस्सं? त्याला ती म्हणाली


बोले लाकूडतोड्या, आता पोट कसे भरू?
पाण्यात पडली कुर्‍हाड, आता काम कसे करु?


प्रश्न त्याचा ऐकून देवी जलात त्या गेली
घेवूनी येते कुर्‍हाड वत्सा, हेची ती बोलली


येताना ती सुवर्णाची कुर्‍हाड घेवूनी आली
अता कसा वागतो बघुया, मनात ती वदली


म्हणे ही माझी कुर्‍हाड नाही, क्षमा करावी मला
जुनीच द्यावी कुर्‍हाड माझी, प्रिय असे ती मला


चांदीचीही कुर्‍हाड जेव्हा देऊ केली त्याला
ही पण माझी नाही देवी, हेची तो वदला


खरेपणाने खुष होवूनी प्रसन्न ती जाहली
सोन्याची अन चांदीचीही भेट त्यास दिधली