Thursday, November 14, 2013

बनीची गोष्ट


"म्याऽऽव"

"म्याव म्याऽऽव"

"बाळांनो इकडे या बघू पटकन" मनीने तिच्या पिल्लांना साद घातली आणि आ‌ईची हाक ऐकून बनी,हनी, गुंड्या, राणी,सोनी,मोनी  दुडू दुडू धावत तिच्यापाशी आले.

बाळं दूध पिण्यात गर्क झाली आणि मनी त्यांना चाटून तिचं प्रेम व्यक्त करण्यात गर्क झाली.

"बाळांनो, हे घर सोडून दुसरी कडे जायची वेळ झालेय हं आता. तेव्हा उगाच मस्ती करून मला त्रास द्यायचा नाही. "बी" विंग मधे एक टिव्हीचा खोका पडलाय ना ती जागा मी आपल्या नवीन घरासाठी नक्की केलेय. एकेकाला तोंडात धरून मी तिथे नेणार आहे. माझ्या मागे उगाच धावत यायचं नाही. अजून तेव्हढे मोठे झाला नाहीत तुम्ही की एकटे इकडे तिकडे काही अडचण न येता स्वत:ला सांभाळत जाऊ शकाल"

"काय कळ्ळं का बनुटल्या मी काय म्हणाले ते?" मनीने मधेच मस्तीखोर बनीच्या टपलीत पंजाने हलकेच मारत विचारलं.

बनीने उत्तरादाखल नुसतच डोकं मनीच्या पोटावर घासलं.

"हम्म! म्हणजे ऐकलच नाहीस तू, मी इतका वेळ काय सांगत होते ते" मनीने त्याच्या डोक्यावर कुरवाळात लाडीक रागाने म्हंटलं.

बनी,हनी, गुंड्या, राणी,सोनी,मोनी  सहा भावंडं पण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे. हनी एकदम भित्री भागुबा‌ई, राणी दिसायला एकदम गोंडस आणि वागायला एकदम आदर्श बाळ, सोनी आणि मोनी एकमेकांशीच जास्त मस्ती करण्यात दंग असलेली जोडी, गुंड्या एकदम गुंडं, इतरांना घाबरवयला जाणारा तर बनी म्हणजे उचापती नंबर वन. बनीला कायम वाटे आपण गुंड्या सारखं धाडसी व्हावं, राणी सारखं गोंडस दिसावं, आणि असं काहीतरी करावं की आ‌ई आपल्यावर एकदम खुश हो‌ईल. तिला आपला अभिमान वाटेल. तसा बनी होता चांगला पण हा उचापती स्वभाव आणि रुसून बसण्याची सवय ह्यामुळे जरा मनीचा ओरडा खायचा इतकच.

बाकीच्यांची कमी पण मनीला बनी आणि हनीची कायम काळजी वाटायची. एक मुलखाची भित्री तर दुसरा एक नंबर उचापती. बरं! गुंड्या सारखा टग्याही नाही की केली उचापत तर सहीसलामत बाहेर पडेल त्यातून.

"संध्याकाळी उन्हं उतरली की जा‌ऊया आपण, आत्ता आराम करा थोडा. मी ही आराम करते थोडावेळ." असं म्हणत मनीने जिन्याखालच्या तिच्या घरात चांगली ताणून दिली.

बनी, हनी, मनी, सोना, गुंड्या, राणी सगळे थोडावेळ तिथेच तिच्या अंगावरून उड्या मारत खेळत राहीले. मग तिने रागावून पंजा उगारल्यावर त्यांनीही तिच्या पोटापाशी जागा करून झोप काढायचं ठरवलं. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात बनी आणि गुंड्याचं झोपायच्या जागेवरून काहीतरी भांडण झालं आणि बघता बघता ते गुर्र गुर्र ह्या नेहमीच्या लाडीक भांडणावरून पंजा पंजीच्या मुष्ठीयुद्धावर गेलं.

आवाज वाढला आणि हे गुरकावणं कानावर जा‌ऊन मनीची झोपमोड झाली तशी ती वैतागली आणि डोळे मिटून हवेतच पंजा फिरवत त्यांना ओरडली. नेमकं तिच्या जवळ त्यावेळी बनीची पाठ असल्याने तिचा पंजा त्याला लागला आणि गुंड्या सकट सगळ्यांनीच त्याला "आ‌ईचा मार" मिळाला म्हणून चिडवून घेतलं.

झालं बनीला रुसून बसायला निमित्तच मिळालं. "हा मी निघालो" म्हणत पडला जिन्या खालच्या खोलीतून बाहेर. हे तसं नेहमीचच होतं म्हणून कोणी त्याला थांबवलं नाही की मनीला उठवलं नाही. नेहमीच तो रुसून "ए" विंग मधल्या तळ्मजल्यावरच्या घराच्या गॅलरीत जा‌ऊन बसायचा. ही गॅलरी त्यांचं पहिलं घर होतं. मग तिथे एक जण रहायला येणार म्हणून घर मालकाने घर साफ केलं तेव्हा ह्यांचीही तिथून उचलबांगडी झाली. खरतर त्या घरमालकाला त्यांना इमारती बाहेरच घालवायचं होतं पण त्यांच्या छोट्या मुलीने हट्ट केला म्हणून त्यांना ही जिन्याखालची जागा मिळाली. हे घर होतं तसं चांगलं पण "मांजरांच्या राज्यातल्या" नियमांनुसार पिल्लं लहान असताना अशा सात जागा बदलायच्या असतात. त्या नियमाला धरूनच मनीने ते घर सोडून "बी" विंग मधे मागच्या बाजूला पडलेल्या टिव्हीच्या खोक्यात नवीन घर करायचा निर्णय घेतला होता.

तर ती हे जिन्याखालचं घर झोपून उठल्यावर सोडणारच होती पण तापुर्वीच ह्या बनी आणि गुंड्याची मारामारी झाली, त्यात बनीला मार मिळाला असं चिडवून सगळ्यांनी बनीच्या रागात भर घातली आणि बनी घराबाहेर पडला.

त्याची पावलं नेहमीप्रमाणे गॅलरीच्या घराकडे वळली, पण तो अर्ध्या वाटेत तसाच थांबला.

"सगळे मला तिथेच जाणार शोधायला. आज मी सगळ्यांना धडा शिकवेन. मला हसतात काय?"  असा विचार करून बनी दोन क्षण तिथेच थबकला. कुठे जावं ह्याचा विचार करताना त्याच्या डोक्यात एकदम एक योजना आली. त्याने ठरवलं सगळ्यांच्या आधी त्या "बी" विंग मधल्या "टिव्ही च्या खोक्यातल्या" घरी जा‌ऊन बसायचं. कितीही दमलो, वेळ लागला तरी चालेल, पण तिथेच जायचं. सगळे पहिले गॅलरीत शोधतील. तिथे नाही दिसलो तर इकडे तिकडे शोधतील. पण कोणाला कळणारच नाही की ह्या टिव्हीच्या खोक्यामधे ये‌ऊन बघावं. मग जेव्हा आ‌ई त्यांना आधी इथे आणून ठेवेल तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. गुंड्याच्या आधी मी ये‌ईन आणि मग त्याला मस्त ठेंगा दाखवेन.

मनात विचार आल्याक्षणी तो "बी" विंग कडे उड्या मारत जा‌ऊ लागला. "ए" विंग ला वळसा घालून तो इमारतीच्या दुसऱ्या भागात आला देखील.
"आता बस अजून थोडं चाललं, अजून थोडी शोधाशोध केली की मग मला घर दिसेल" असं स्वत:शीच म्हणत त्याने पुढचं पा‌ऊल टाकलं आणि तिथेच उभा राहिला. पायापाशी एक सावली दिसली म्हणून मान वर करून बघीतलं तर वरच्या मजल्यावर रहाणारा गोट्या उभा होता.

बनी घाबरला. अर्थात त्याला कारणही तसच होतं. हा गोट्या सगळ्यानाच त्रास द्यायचा. इमारतीतल्या लहान मुलांपासून ते प्राण्यांपर्यंत सगळ्यांनाच त्रास द्यायचा. अगदी फुलपाखरांना आणि चतूरांना पण पकडून त्रास द्यायचा.

पुढ्यात उभ्या असलेल्या बनीला बघून त्याला एकदम खुनशी आनंद झाल्याचं बनीला त्याच्या चेहऱ्यावरून लग्गेच कळलं. खाली वाकून गोट्या त्याला उचलणार इतक्यात चपळा‌ईने बनी वळला आणि जीव खा‌ऊन धावत सुटला.

त्याच्या मागे "ए कुठे जातो, ए थांब" असं म्हणत येणाऱ्या गोट्याला बघून बनीने त्याचा वेग वाढवला. सोसायटीच्या फाटकाला असलेल्या फटीमधून एकदम बाहेर उडी मारून बनी रस्त्यावर कधी आला त्यालाही कळलं नाही. जीवाच्या भीतीने धावत एकदम रस्त्यावर आला तेव्हा त्याला जाणिव झाली ह्या गोष्टीची. मागे वळून बघीतलं तर गोट्या फाटका पाशीच उभा दिसल्याने मागे जाणं तर शक्यच नव्हतं ,तेव्हा तो तसाच पुढे धावत गेला आणि गोट्या दिसेनासा हो‌ईपर्यंत धावतच राहिला. पण ह्या नादात तो इमारती पासून खूप दूर आला. परत जाण्याचा मार्ग काही त्याला सुचेना तेव्हा एकदम भांबावून गेला. त्यात इकडून तिकडे आणि तिकडू इकडे भरधाव जाणाऱ्या रिक्षा, बा‌ईक्स, बस ह्यामधे तो गोंधळून तसाच उभा राहिला. नेमकं एक रिक्षा चुकवायला गेला आणि धडपडून पडला. पडला तोच एका सायकल वाल्याच्या सायकल समोर आला. सायकलस्वार पण अचानक आलेल्या बनीमुळे गोंधळला आणि त्याचा तोल गेला.

बिच्चारा बनी! त्याला चांगलाच अपघात झाला. जीव वाचला पण पाय काही उचलता ये‌ईना त्याला.

आता मात्र बनीला आ‌ईची, हनीची, सोनू, राणी, मोनी सगळ्यांचीच आठवण ये‌ऊन रडू यायला लागलं. सायकल स्वाराने आधी सायकल बाजूला करून बनीला हळूवार उचलून घेतलं. स्वत:बरोबर त्याला स्वत:च्या घरी ने‌ऊन जखमेवर हळदीचा लेप लावला. दूध प्यायला दिलं.

संध्याकाळ झाली तरी बनी काही पायावर उभा राहू शकत नव्हता, हे बघून त्या सायकलस्वाराने त्याला एका बास्केट मधे ठेवलं आणि मित्राला सोबत घे‌ऊन त्याने प्राण्यांचा दवाखाना गाठला.

डॉक्टरांनी पायाच्या जखमेला औषध लावलं आणि जबरदस्तीने तोंड उघडून एक कसलं तरी कडू चवीचं औषध तोंडात घातलं. जाताना बरोबर काही औषधं आणि जखमेवर लावायला एक पावडर पण दिली कसलीशी.

सुरूवातीला त्याला ह्या सायकलस्वाराचा खूप राग यायचा. त्याला वाटायचं एका गोट्याच्या तावडीतून सुटून दुसऱ्या गोट्याच्या तावडीत सापडलो आहोत आपण.

पण थोड्याच दिवसात त्याला कळून चुकलं की हा सायकलस्वार गोट्यासारखा दुष्ट अजिबात नाही आहे. तो जे करतोय ते आपण बरं व्हावं म्हणून करतोय.

मग मात्र बनी त्याला सहकार्य करू लागला. रोज दूधाचा खुराक खा‌ऊन, पेडीग्रीचे दाणे खा‌ऊन, औषध घे‌ऊन आणि सायकलस्वाराच्या प्रेमळ सहवासाने बनी लवकरच ठणठणीत बरा झाला.

एकीकडे त्याला आनंद होत होता पण दुसरी कडे त्याला त्याच्या आ‌ईची, बहिण भावांची आठवण ये‌ऊन वा‌ईट वाटायचे. विशेषत: आ‌ईला किती वा‌ईट वाटत असेल हे जाणवून रडू यायचे. पण एकट्याने परत जा‌ऊन त्याचं घर ज्या इमारतीत होतं तिचा शोध घेणं त्याच्या अवाक्या बाहेरचं होतं. तो रस्ता, त्या रस्त्यावरचं वडाचं झाड, त्या झाडाच्या बुंध्याशी असलेली एका कुठल्याश्या देवाची तसबीर, त्या तसबीरी भोवती लावलेली अगरबत्ती, झाडाच्या मागे असलेलं रसाचं गुऱ्हाळ आणि त्या गुऱ्हाळाच्या तोंडाशी असलेलं उंदराचं बीळ, ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी त्याला आईच्या बोलण्यातून ऐकून पाठ झाल्या होत्या. पण तिथपर्यंत जायचा रस्ता मात्र आठवत नव्हता.

त्या दिवशी त्याच्या नव्या दोस्ताने म्हणजे सायकलस्वाराने त्याला अंघोळ घातली, अंघोळ हा एकच प्रकार त्याला अजिबात आवडत नसे. त्याने ना‌ईलाजाने घालून घेतली अंघोळ. मग त्याला कोरडं करून ते दोघे सायकल वरून भटकायला निघाले. त्याच्यासाठी त्याच्या दोस्ताने स्पेशल बास्केट लावून घेतली होती सायकल वर. तिच्यात बसून आजुबाजूला बघत फिरायला बनीला खूप आवडायचं.

"आज आपली दोस्ती हो‌ऊन बरोब्बर एक महीना झाला मित्रा" सायकल स्वार त्याला थोपटत म्हणाला. आजचा दिवस आपला मैत्रीदिन, म्हणून तुला अंघोळ घालून आज इथे आणलय जिथे आपण पहिल्यांदा भेटलेलो. बघ आठवतेय का ही जागा?" सायकलस्वाराने थोपटत म्हंटलं तसं बनीने आजुबाजूला जरा जास्तच निरखून बघीतलं.

त्याचा अपघात झाला तिच ही जागा, हे थोडा ताण दिल्यावर त्याच्या लक्षात आलं.

म्हणजे घरही इथून जवळच असणार असं त्याला वाटून गेलं.

"माझ्या मित्रा, मला माहिती आहे तुला तुझ्या घरच्यांची आठवण येते. मी बघतो ना इतर मांजरी जेव्हा त्यांच्या पिल्लांना चाटतात तेव्हा तू लांबूनच ते बघत हरवून जातोस. म्हणून तर आणलं तुला इथे आज. आता तू बरा झालायस पूर्ण पणे. आता शोधूयात तुझं घर" सायकल स्वाराने बनीच्या केसातून हात फिरवत म्हंटलं.

बनीला त्याच्या आणि त्याला बनीच्या भाषेतले शब्द न शब्द कळत नसले तरी स्पर्शाची भाषा बरोब्बर कळायची.

बनीने हळूच त्याच्या हातातून उडी मारली आणि मग बनी पुढे आणि त्याचा दोस्त त्याच्या मागे मागे अशी त्यांची जोडगोळी बनीचं घर शोधत निघाली.

ओळखीच्या खुणा शोधता शोधता एकदाचं ते वडाचं झाड त्याच्या खालची तसबीर, अगरबत्ती, उसाचं गुऱ्हाळ ह्या सगळ्या खुणा पटल्या आणि बनीने एकदम आनंदाने "म्याव" केलं. मग झपाझप दोघेही त्या इमारतीपाशी पोहोचले. फाटकातून आत, मग "ए" विंग पाशी, मग "बी"विंग पाशी असं सगळीकडे गेले. जिन्याखाली तर कोणीच नव्हतं, टिव्हीचा खोकाही नव्हता बी विंगच्या मागे. आता कुठे शोधायचं असा विचार करत असतानाच त्यांना बारिकशी "म्याव म्याव" ऐकू आली आणि त्या दिशेने धावायला बनीने सुरूवात केली. त्याच्या मागून त्याचा दोस्त धावत होता. सोसायटी मधल्या बागेतल्या पप‌ईच्या झाडाच्या मागे सोनी आणि मोनी खेळत होते. बनीने त्यांना साद घातली. बनीला बघून दोघांनाही खूप आनंद झाला. तिघांनी एकमेकांच्या अंगावर उड्या मारून आनंद साजरा केला. मग तिघेही नवीन घराकडे निघाले. पण जाण्यापूर्वी आपल्या दोस्ताशी ओळख करून द्यायला तो विसरला नाही आणि दर मैत्रीदिनी ते इथेच भेटणार ह्या वचनाची आठवण द्यायलाही तो विसरला नाही.

(पूर्व प्रसिद्धी: ई साहित्य प्रतिष्ठान बालनेटाक्षरी प्रस्तुत "धम्म धमाका ई दिवाळी अंक २०१३")

एक "दे" बोलगाणे


थेंब थेंब मुरू दे
माती मधे जिरू दे
बी त्यात रुजू दे
कोंब त्याला येऊ दे

कोंब असा वाढू दे
पान त्याला फुटू दे
माझ्या उंची येव्हढी
फांदी त्याची वाढू दे

फांदी फांदी नटू दे
फुलांनी हसू दे
थोडी फूलं देवाला
थोडी मला मिळू दे


(पूर्व प्रसिद्धी: ई साहित्य प्रतिष्ठान बालनेटाक्षरी प्रस्तुत "धम्म धमाका ई दिवाळी अंक २०१३")