Friday, June 25, 2010

आटपाट नगरी

ऐक बाळा! तुझ्या साठी रचली कहाणी
आटपाट नगरा मधे रहात होती राणी

आवडायाचे तिला तिथले खळाळते पाणी
खळाळत्या पाण्यासह म्हणायची गाणी

गोड गोड गाणी गात ती चालायची वाट
आवडत मुळ्ळी नव्हता तिला उगा थाटमाट

राणी सारखाच होता अगदी; आटपाटचा राजा
कामाचा ना केला त्याने कध्धी गाजावाजा

आटपाट नगरामधे सारेच होते गोड
कध्धी नाही काढायाचे कुणाचीही खोड

आवडेल का ग फिरायला आटपाट नगरीत?
पण जायच्या आधी शिकून घ्यावी लागेल तिथली रीत

चालत नाही मारामारी, ना हेवेदावे काही
उगा कुरापत करु पहायाची नाही

फुलपाखराला पकडलं तर शिक्षा होते भारी
शिक्षा म्हणून कट्टी घेतात आटपाटची सारी

हे सारे नियम पाळतात राणी आणि राजा
म्हणून तर नियम पाळते इथली सारी प्रजा

अशी आहे आटपाट नगराची कहाणी
आवडले का आटपाटचे राजा आणि राणी?

बडबडगीत - टोपीविक्या

एके दिवशी टोपीविक्या
चालला होता बाजारी

डोक्यावरती ओझे घेऊन
थकला होता तो भारी

दिसता झाड; केला विचार
खाऊन घ्याव्या भाकर्‍या चार

झोपही घेऊ थोडीफार
मSग भरभर गाठू बाजार

नव्हते त्याला पण ठावूक
झाडावर होती माकडे खूप

माकडे होती फारच हुशार
टोप्या घेऊन झाली पसार

झोपून उठता बघतो तर
टोप्या नव्हत्या जागेवर!

वरती बघता प्रकार कळला
माकड रावांचा प्रताप कळला

दगड मारुनी घाबरवले
तरी न माकड घाबरले

काय करावे कळेना
डोकेच त्याचे चालेना

डोक्यावरची टोपी फेकुन
तो ही बसला हताश होऊन

बघता त्याची टोपी खाली
माकडांनीही नक्कल केली

नकले मुळे गंमत झाली
टोप्या सगळ्या पडल्या खाली

टोप्या सार्‍या गोळा करुन
ऐटीत निघाला टाटा करुन

बडबड गीत

http://www.youtube.com/watch?v=0L2aabyyJRU

आईची हाक आली पळा पळा
कामाची यादी सांगते पळा पळा


हे पुसुन ठेव, ते भरुन ठेव
म्हणे आंबे खुप खाल्लेस;
अता थोड जेव

जेवणात काय? तर पोळी नी भाजी
महिन्यातुन एकदाच म्हणे खावी पावभाजी

उन्हात नको जाऊ, म्हणे "सनस्ट्रोक होईल"

गर्दीत नको धावु, म्हणे "पळवुन कोणी नेईल"

घड्याळाची टिकटिक;
आईची किटकिट, थांबतच नाही
मनासारखं वागता येतच नाही

सानुची तक्रार आणि मागणी

सकाळची थंडी;
नी अंगात बंडी

उबदार दुलईत गुडुप्प व्हाव
जादुने घड्याळच गायब कराव

वाटत फार;
वारंवार

पण घड्याळाची टिकटिक
आईची किटकिट; थांबतच नाही
मनासारख झोपता येतच नाही

उठ ना रे बाळा;
आहे तुझी शाळा

आईचा धोशा चालुच राही
मनासारख झोपता येतच नाही

नको नको उठते;
शाळेत मी जाते

बाईंना तिळगुळ द्यायचाय ना आई?
चल आटप; बस माझी जाईल ना ग आई

उद्या आहे सुट्टी;
घड्याळाला बुट्टी

उद्या मला लवकर उठवायच नाही
घड्याळाला गजर लावायचा नाही

उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार

मग मला हट्टी म्हणायच नाही
लवकर अजिबात उठवायच नाही

सानुचे प्रश्न

देवबाप्पाच घर कुठे असतं आई?
त्यालाही असतात का बाबा आणि आई?

त्यालाही असते का शाळेत जायची घाई?
होमवर्क नाही केला तर ओरडतात का बाई?

बाबा म्हणतो "फ़िशू" आपला बाप्पा कडे गेला
बाप्पा एकटा कंटाळतो म्हणुन खेळायला का गेला?

खेळुन त्यांच झाल की येईल का मग घरी?
वाट पहाते सांग त्याला त्याची सानु घरी

अभ्यास पण मी करुन टाकला एकदम झटपट
दुध पण मी पिऊन टाकल एकदम घटघट

सांग त्याला आता मी शहाणी सानु झालेय
लवकर ये बाप्पा कडुन मी खाऊ घेऊन आलेय

सानु आणि पिंकु परी

पिंकु परी येते सानुच्या घरी
खाऊन जाते श्रिखंड पुरी

पिंकु परी जाते शाळेत जरी
जादुची छडी तिचा होमवर्क करी

पिंकु परीची बातच न्यारी
खेळायला येतात चांदण्या दारी

खेळायला आल्या चांदण्या जरी
सानु आवडते तिला भारी

सानुच्या स्वप्नात मग येते परी
गोड पापा घेते नी जाते तिच्या घरी