Friday, July 30, 2010

कहाणी चवळीचटकच्या लोकांची

(लेक कुरुकुर करायला लागली की मी तिला ह्या दोन मित्रांची नावं सांगायचे "एक सदा हसे आणि दुसरा रडत राऊत" रडत राऊन नेहमी रडतो आणि रडवतो तर सदा हसे हसतो हसवतो. तिला ह्या नावांची गंमत वाटायची म्हणून "रच्चून सांग ना त्यांची गोष्ट मधे त्या दोघांची नाव समाविष्ट झाली :P)


 
अटकमटकराज्यातल्या चवळी चटक गावात एके दिवशी एक जम्मतच होते. गावातले सगळे लोकं धाय मोकलून रडायला लागतात. दात घासताना रडतात, न्याहारी करताना रडतात. दिवसभर आपले रडतच बसतात. हे रडणं थांबायला ते गावातल्या दवाखान्यात जातात. तर तिकडे काय बघतात? तिकडेही डॉक्टर रडतच औषध देत असतात. गावकरी घाबरुन जातात. डॉक्टर म्हणतो हा काहितरी व्हायरसचा प्रताप असणार.. माझ्याकडे तरी ह्यावर औषध नाही. दुसर्‍या गावातल्या दवाखान्यात जाऊन बघायला हवं. गावात तर सगळ्यांनाच ह्याची लागण झालेय.




गावकरी मग हे रडणं थांबण्यासाठी सर्कशीतल्या विदुषकाला बोलावतात. तो ही बिचारा आजारी असतो. येतो तोच मुळी रडून रडून नाक लालबुंद करुन. रडतच तो विचारतो "काय सेवा करु? उड्या मारुन दाखवू? की नकला करुन दाखवू?" इतक बोलूनही पुन्हा रडायला लागतो ढसाढसा.



"अरे! तुच काय रडतोयस? आमचं रडणं बंद व्हावं म्हणून ना तुला बोलावलं इथे? तुला पण झालेय बाधा रडण्याच्या व्हायरसची?" सरपंच त्याला विचारतात.



"बघा ना सरपंचजी, काल सर्कशीत एक माणूस आला त्याच्याकडून मी हा सदरा घेतला आणि झालं तेव्हापासून माझं रडणं काही केल्या थांबतच नाहीये" डोळे पुसत पुसत विदुषक त्यांना सांगतो



"अच्छा! तो नवीन दुकानदार "रडत राऊत" त्याच्याकडूनच घेतलास का विदुषका तू सदरा?"



"होय होय तोच तोच"



"अरेच्चा! आम्हीही त्याच्याकडूनच घेतलाय सदरा. म्हणजे हा सदरा आहे की काय कारण ह्या व्हायरसचे?"



"चला गावाची बैठक बोलवा"



"होSS होSS आत्ताच दवंडी पिटूयात. चला लागुयात कामाला"



"ऐकाSS होSS ऐकाSS. चवळीचटकच्या रहिवाशांनोSS ..



ढम्मSSढम्म ढम्म ढम्म ढम्मSS..



कान देऊन ऐकाSS...



उद्या दुपारी जेवण झाल्याबरोबर सगळ्या गावकर्‍यांनी चावडीपाशी जमावे होSSSS येताना "रडत राऊत ह्या व्यापार्‍याकडून घेतलेला सदरा घेऊन यावे होSSS "



"गावाला झालेल्या ह्या नव्या विषाणूवर उपाय करण्यासाठी सगळ्यांनी हजर रहावे होSSSS"



गावात दवंडी फिरते तशी सगळे रडत रडत एकमेकांकडे चौकशी करायाल लागतात.



"काय होणार आहे रे उद्या दुपारी चावडीवर?" रडवेला चेहर्‍याचा रामू शामुला विचारतो.



"मलाही नाही माहित. पण खूप कंटाळा आला बघ आता रडून रडून" डोळे नाक पुसत पुसत शामु रामुला उत्तर देतो.



तो दिवस रडारडीतच पार पडतो. दुसरा दिवस उजाडतो, सकाळ सरते.दुपार होते. तशी सगळे गावकरी रडत रडत चावडीवर जमा होतात.



सगळ्यांचे डोळे रडून रडून सुजलेले असतात. नाक लाल झालेले असते. चेहरा रडुन रडून सुकलेला असतो आणि तरिही रडं थांबलेलं नसतं.



सरपंचजी येतात, येताना बरोबर कुणा व्यक्तीला घेऊन येतात. येतात तेच चक्क हसत हसत. डोळ्यात एक टिप्पूस पाणी न आणता, डोळे - नाक लाल न होता.



सगळे रडत रडत त्यांना विचारतात "सरपंचजी सरपंचजी असं कस्सं झालं?" "आम्ही रडतोय आणि तुम्ही हसताय? तुम्हाला बरं औषध सापडलं. काय केलत तरी काय?"



"होSS होSS सांगतो सांगतो. आधी सांगा मी सांगितलेला सदरा घेऊन आलायत का?"



सगळे एकाच रडक्या सुरात होSS म्हणतात. जे सदरा घालून आलेले असतात त्यांची तर अवस्था फारच वाईट असते. गडबडा लोळण घेत ते धाय मोकलून रडत असतात.



"तर आता एक काम करा. इकडे होळी पेटवा बघू आधी. आणि त्या होळीत तुम्ही घेतलेले हे सदरे जाळून टाका"



"काय? जाळून टाकायचे? का पण? आणि आमचे पैसे?"



"तुम्हाला रडत रहायचय की बर वाटायला हवय?"



"नाही नाही रडायच नाहीये आम्हाला" डोळ्यातून येणार पाणी पुसत पुसत कुशाबा कसे बसे बोलतात.



"मग माझं ऐका आणि सगळे सदरे जाळून टाका."



"आणि.... मग?"



"आणि हा जो व्यापारी आलाय माझ्या बरोबर त्याच्याकडून घेतलेले सदरे वापरायला सुरुवात करा"



"ह्या! असं कधी असतं होय?"



"तसच आहे हे. तुमचा विश्वास नाही बसत आहे का? बर मग राम्या तू ये बघू इकडे तुझा सदरा घेऊन. उपाय नाही झाला तर मी तुला त्याचे पैसे परत करतो मग तर झालं?"



"हम्म! आता राम्या हा तुझा सदरा मी ह्या होळीत जाळून टाकतो. "



भस्सSS काय लाल निळ्या ज्वाळा निघाल्या त्यातून.



"आता ह्या "सदा हसे" कडून तू एक सदरा घे बघू."



"हम्म! आता हा नवा सदरा अंगात घाल"



"हाSSहाSSहाSSहाS सरपंचजी मला हसता यायला लागलं, रडणं पळून गेलं माझं"



"हे काय तरी आक्रितच दिसतय. पण बरोबर बोलतायत सरपंच" सगळे एकमेकांत बोलतात. एक एक जण पुढे येतो नी "रडत राऊत" कडून घेतलेल्या सदर्‍याची होळी करतो. आणि सदा हसे कडून नवीन सदरा विकत घेऊन तो अंगात घालतो.



"पण असं झालं कस?" सगळ्यांना प्रश्न पडतो.



सदा हसे बोलायला उभा रहातो.



"माझ्या दोस्तांनोSS, मी आणि रडत राऊत दोघेही एकदा व्यापारा निमित्त एका गावात एकत्र आलो. दोघांचाही तयार कपड्यांचा व्यवसाय होता म्हणून ओळखही झाली एकमेकांशी. आमची आधी मैत्री झाली आणि आम्ही दोघे मिळुन व्यापार करायला सुरुवात केली. रडत राऊत मुलखाचा रड्या होता. जर्रा काही झालं की रडायचा. सुरुवातीला जेव्हा आम्ही एकत्र व्यापार करायचो तेव्हा माझ हसणं आणि त्याचं रडणं अस बेमालूम मिसळायचं सदर्‍यात की लोकं ना जास्त हसत बसायची ना कायम रडत रहायची. पण नंतर त्याचं रडणं वाढत गेलं आणि मला दुसर्‍या "आनंद महागुरुची" साथ मिळाली तसा त्याने माझ्या बरोबरचा व्यवसाय बंद करुन स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. त्याच्या कडून कपडे घेऊन घालणारेही त्याच्याच सारख रडायला लागायचे. लोकांना जेव्हा हे कळल तेव्हा त्यांनी त्याला गावातून पळवून लावलं.

मग त्याने काय केलं? तो तुमच्या गावात आला. त्याने कमी किमतीला सदरे विकायला सुरुवात केली आणि सगळे सदरे विकून तो इथून पुढच्या गावी गेला. जाताना त्याचा रडवेपणा सदर्‍यांबरोबर इथे सोडून गेला. तुमच्या सरपंचांच्या हे लक्षात आलं विदुषकाच्या बोलण्यावरुन. मग ते अटकमटकच्या राजाला येऊन भेटले. राजाने राजवैद्यांना पाचारण केलं. राजवैद्यांकडून त्यांना माझा पत्ता मिळाला आणि ते तडक माझ्याकडे आले. आणि मग आम्ही नवीन सदरे घेऊन लगोलग ह्या गावात परत आलो."



"रडत राऊतचे सदरे जाळून आणि सदा हसे कंपनीचे सदरे वापरायला सुरुवात करुन चवळीचटकचे लोकं पुन्हा हसू खेळू लागले"


आता रडत राऊत गुपचुप अदृश्य सदरे लहान मुलांच्या अंगावर टाकून पळून जातो. मग ती लहान मुलं सारखी रडत बसतात. तेव्हा तुम्ही सारखे रडत असाल तर समजून जा रडत राऊत तुम्हाला त्याच्याकडचा एक रहिलेला अदृष्य सदरा घालून पसार झालाय दुसर्‍या घरी. मग तुम्ही काय कराल? सदा हसेची आठवण काढा आणि त्याच्या आनंदी कंपनीचा गुदगुल्यांचा सदरा अंगावर चढवा

Thursday, July 22, 2010

यायाची गोष्ट

"आईSS"


"काय रे याया?"

"आई, काल ना शाळेत सायन्सच्या तासाला बाईंनी आम्हाला सांगितलं आम्ही आत्ता दिसतो तसे नव्हतोच लहानपणी" "म्हणजे ग काय?"

"काय तरी मेटाम... "

"मेटामॉर्फॉसिस म्हणजे रुपबदल"

"हा बरोबर आई, तेच म्हणाल्या बाई. तेच काय ते झाल. म्हणजे...मी आधी असा नव्हतो पंखवाला?" डोळ्यात अपार उत्सुकता आणून यायाने मला विचारलं.

"आता ह्याला कसं समजवावं बर....? पटकन आठवलं"

"याया, बाळा जा बर कपाटातून तुझा अल्बम घेऊन ये फोटोंचा"

"पण आई आधी सांग ना ते मेटा काय आहे ते" मी टाळतेय अस वाटून याया माझ्या पंखांना हलवून माझ लक्ष वेधून घेत म्हणाला

"अरे बाळा तेच सांगतेय, आधी अल्बम तर घेऊन ये" मी हलकेच टपलीत मारत त्याला म्हंटल तसा तो पळाला कपाटातून अल्बम आणायला

  "हाच अल्बम ना आई?"    त्याने हात उंचावत विचारलं



"होSS :) आण इकडे आणि बस माझ्या बाजूला. मी सांगते तुला आता, तू कसा होतास ते"


         "हे बघ हा कोण आहे फोटोत ओळख बघू!"  



एकदा फोटोकडे एकदा माझ्याकडे बघत गोंधळात पडलेल्या यायाकडे बघून मला हसूच येत होतं पण हसले तर स्वारीला राग यायचा नी मग तो रुसुन कुठल्या तरी झाडावर जाऊन बसायचा म्हणून हसू दाबत त्याला म्हंटल "अरे हा तुच आहेस"



त्याचा अजिबात विश्वास बसला नाहीये हे त्याचा चेहराच सांगत होता. मग कस समजवाव ह्याचा विचार करताना मला एका पुस्तकाची आठवण झाली.थांब ह्या पुस्तकातल एक चित्रच दाखवते तुला






"हे बघ फुलपाखरु होण्यासाठी आधी चार परिक्षा पार कराव्या लागतात. छोट फुलपाखरु आधी एक अंड असतं जसा तुझा फोटो तू बघितलास"



"मग ५-७ दिवसांनी त्या अंड्यातून एक अळी बाहेर येते त्यालाच कॅटरपिलर म्हणतात. त्या अळीच काम एकच झाडांची पानं खात सुटायचं नी वाढत जायचं"



"आई म्हणजे ह्या माझ्या फोटोसारख?"  



"आत्ता कस! बरोबर हा तुझाच फोटो आहे"



"पण अस अळी असताना खूप भीती असते हा बाळा. पक्षी ह्या अळया पकडून खातात."



"बापरे! मग मी कसा वाचलो?"



"ज्या अळ्या पानांच्या आड लपतात त्या वाचतात. आणि अळ्यांचा रंग पण बहुतेक वेळा पानांच्या रंगासारखा असतो ना म्हणून पटकन दिसत नाहीत त्या पक्षांना"



"हम्म! आई, बाई पण असच काहीतरी सांगत होत्या काल"



"पण तू आणि जाजा गप्पा मारत बसला असाल म्हणून तुला नीट कळल नाही आणि आता नुसतं मेटा मेटा करत बसला होतास. हो ना?"



"बर आई पुढे सांग ना काय होत ते" त्याने विषयाला बगल देत मला विचारलं



"अंड्यातून बाहेर पडण ही पहिली परीक्षा. ही पहिली परीक्षा पास झाल की अळी होता येतं ह्या तुझ्या फोटो सारख"



"भरपूर खाऊन टुमटुमीत झालेली अळी एकदिवस दुसरी परीक्षा द्यायला झाडाजवळ येते. आणि हि परीक्षा द्यायला चक्क उलटं लटकून स्वतःभोवती कवच करावं लागतं. अगदी बंदिस्त व्हाव लागत त्या कोशात. ती परीक्षा पास झाल की त्या अळीचा होतो प्युपा"
हा असा"



"बापरे! मग अंधारात भीती नाही वाटत त्याला?"



"अहं!, अजिबात नाही. फुलपाखरु असतातच धीट आणि त्या परिक्षा पास झाल्यावरच इतके छान पंख असलेल फुलपाखरु होता येत ना"



"म्हणजे मी पण नव्हतो घाबरलो?"



"तू तर शूरच आहेस तू कसा घाबरशील?" मी हसत म्हंटल



"आणि मग एक दिवस ह्या प्युपाला पंख येतात, त्याला सहा पाय, दोन डोळे, दोन अँटिना येतात आणि एक स्ट्रॉ सारखी नळी तयार होते तोंडाजवळ. मग त्याच बघता बघता सुरेखस फुलपाखरु तयार होत"  



हे असं



"आई, हे तर जाजाला पण माहित नसेल. उद्या बाई विचारतील तेव्हा मलाच सांगता येईल ना!" खुष होत अल्बम नाचवत याया मला म्हणाला.



"बर आता संपले असतील तुझे प्रश्न तर मी लागू कामाला? पाऊस पण थांबलाय बाहेर. तुला आज सानिका कडे नाही जायचं खेळायला?" आठवण करुन देताच अल्बम तिथेच टाकून स्वारी पंख झटकून बाहेर पण पडली



--------------------



"साSनिSकाSSS साSनिSकाSSS"    



काय रे याया,कित्ती उशीर केलास आज यायला?" रुसुन बसत सानु म्हणाली









"तुला माहितेय आज मी काSय काSय शिकून आलोय ते? तुला पण नसेल माहित फुलपाखरु कस होत ते" तिला चिडवत याया म्हणाला


"माहित्येय हॅ मॅला, आमच्या कढीपत्याच्या झाडावर कॅटरपिलर आलं की बाबा सांगतो मला, त्याचच फुलपाखरु होत म्हणून"


"शॅSS तू तर सगळा सस्पेंसच घालवलास" नाराज होत याया तिला म्हणाला. परत डोळे चमकून म्हणाला "पण पण तुला तेव्हढच माहितेय. तुला कुठे माहितेय आम्हाला चार परीक्षा द्याव्या लागतात ते." तिला चिडवत चिडवत याया म्हणाला तशी सानिका पण त्याच्या मागे लागली "ए सांग ना रे. मित्र ना तू माझा अस्स काय करतोस"


आत्ता कुठे त्याला पुन्हा स्पेशल वाटायला लागल "ऐक तर मग. आधी एक छोट्टस अंड असतं, मग त्यातून अळी बाहेर पडते ती अळी खा खा खात सुटते झाडांची पानं"


"ए पण नुसतीच पानं? तहान लागली तर काय करता रे? " मधेच सानिकाची शंका येते


"हॅ! त्या पानांमधे पण असतो की थोडा रस बर्‍याचदा पुरतो तो. आम्ही खातो खातो आणि वाढत वाढत जातो. अस वाढताना ४-५ वेळा आम्ही आमची जुनी त्वचा टाकून नवीन त्वचा तयार करतो"


"बापरे! म्हणजे सापासारखं?"


"हं! असेल" यायाला कुठे माहित असतो साप कोण ते. तो आपला हं हं म्हणून विषय संपवतो.


"आणि पुढे...?" मोठ्ठाल्या डोळ्यांनी सानु विचारते


"मग? मग आम्ही झाडाला लटकतो आणि स्वतःभोवती जाळं विणतो. तेव्हा कुठे आमचं अस रंगित पंखवालं फुलपाखरु होतं"


"बापरे! पण त्या जाळ्यात अंधार असेल ना?" सानु काळजीने विचारते

"असतो पण फुलपाखरु व्हायला हे तर करावच लागतं" याया शाईन मारत तिला म्हणतो


"हम्म! कित्ती क्युट आहेस रे तू" सानिकाला आपल्या ह्या मित्राचा खूप अभिमान वाटतो.


"ए! तुम्ही पण आमच्या सारख झोपता का रे?" ती पुन्हा विचारते


"अहं! आम्ही आराम करतो म्हणजे तुझ्या भाषेत झोपतो पण डोळे उघडे ठेवून"


"क्काय? डोळे उघडे ठेवून? म्हणजे हे अस्स?" सानू स्वतःचे डोळे ताणून दखवत विचारते


"आमच्या डोळ्यांना पापण्या नसतात ना, म्हणून आम्ही तसेच झोपतो. आणि ह्या स्ट्रॉ सारख्या दिसणार्‍या नळीने आम्ही फुलांमधला मध खातो"


"अच्छा! अस आहे तर. कित्ती मस्त ना. मला घेउन जाशील एकदा तुझ्या घरी?"


"जाईन, पण आता बाय मला भूक लागलेय. मी चाललो मध गोळा करायला"


"टाटा पुन्हा भेटू" 


अस म्हणून याया सानिकाच्या हातावरुन उडून जातो.

Sunday, July 18, 2010

गोष्टीची गोष्ट -२

पुन्हा एकदा मागणी झाली "आई, मरमेडची गोष्ट हवी त्यात याया पण हवाच हे ओघाने आलच"




"गोष्ट फार छोटी नको" हे पण शेपूट जोडीला होतं.



मग पुन्हा एकदा तिनेच मरमेडच नामकरण केलं "बार्बी" आणि आमची गोष्ट सुरु झाली.



एका निळ्या निळ्या समुद्राच्या तळाशी बार्बी नावाची मत्यकन्या रहात असते. तिच्या कपाळावर एक चमकता मणी असतो. ती तिथल्या राजा राणीची लाडकी मुलगी असते. खूप प्रेमळ असते ही बार्बी. त्यांच्या राजवाड्यात बरेच मासे, कासवं इतर जलचर प्राणी राजाची भेट घ्यायला येत असतात. राजा सिंहासनावर बसून त्या सगळ्यांना भेटत असे तेव्हा ही छोटी बार्बी त्याच्याच मांडीवर बसून राही. तिथेच तिला समजल की ह्या समुद्राच्या बाहेर देखील एक सुंदर जग आहे. तिथे तर्‍हेतर्‍हेचे प्राणी, राक्षस रहातात. तिथे चांदण्यात चमकणारी वाळू आहे, मोठ्ठी मोठ्ठी झाडं आहेत.



आणि झालं तिचा ६ वा वाढदिवस जेव्हा येतो जवळ तेव्हा ती हट्टच करते "मला समुद्राच्या बाहेर घेऊन चला



"बाळा, ते खूप लांब आहे आणि तिथे जायला बरेच दिवस लागतील. तू अजून छोटी आहेस शिवाय तिथे माणूस नावाचा प्राणी रहातो. माणूस प्राण्यात पण काही लोक दुष्ट आहेत. आणि आपण त्यांच्या तावडीत सापडलो तर ते आपल्याला मारुन टाकतील.आणि तुझ्या कपाळावरच्या मण्याच्या लोभाने ते तुला पकडून ठेवतील"



"नाही, मला तिथेच जायचय. आपण लवकर परत येऊ. मी हात सोडणार नाही तुम्हा दोघांचा. प्रॉमिस! समुद्रेश्वराची शपथ" अस त्यांना सांगून ती त्यांना तयार करते.



शेवटी लेकीच्या हट्टापुढे राजाराणी हात टेकतात आणि जास्त न रेंगाळता एका दिवसात परतायचं ह्या बोलीवर तिथे जायची तयारी करायला सुरुवात करतात.



बार्बीला खूप आनंद होतो. तिच्या मैत्रिणींना ती सांगते "मी तिथून तुमच्यासाठी चमकणारी वाळू घेऊन येईन. जमल तर झाडाचं पान आणेन आणि काय काय गमती करेन ते पण सांगेन" त्यादिवशी ती झोपेत पण त्याच विचाराने हसत असते हळूच.



दुसर्‍या दिवशी बरोबर कोरल्सच सँडवीच घेऊन राजाराणी आणि बार्बी निघतात प्रवासाला. प्रवास थोडा दमणूक करणारा असतो पण डॉल्फिन त्या तिघांना आपल्या पाठीवर बसवून किनार्‍याला आणून सोडतात.



किनार्‍याला पोहोचतात तेव्हा रात्र झालेली असते. किनार्‍यावर तशी सामसुमच असते. बार्बी चंद्रप्रकाशात चमकणारी वाळू बघून खुपच खुष होते.



पण त्या किनार्‍यावरच झोपडी बांधून एक माणूस रहात असतो. तो ह्या तिघांना बघतो. बार्बीच्या कपाळावरचा चमकणारा मोती बघून त्याला हाव सुटते. ह्या मत्सकन्येला पकडून मारले तर तो मणी विकून आपण खूप श्रिमंत होऊ असा विचार करुन तो एक योजना आखतो. त्याच्याकडे मासे पकडायच जाळं असतं. वाळूत खेळून दमून थकून तिथे बसलेल्या राजा राणी आणि बार्बीवर तो हळूच ते जाळं टाकतो आणि फासे आवळतो. त्यांना कळायच्याही आधी ते त्याच्या जाळ्यात अडकतात. धडपड करुन देखील जेव्हा सुटका होत नाही तेव्हा ते मदतीला हाका मारतात.



तिथूनच जवळ अबडक फुलपाखरु उडत जात असते. ते ह्या तिघांच्या मदतीच्या हाका ऐकतं पण ते असतं छोट आणि दुबळं मग ते यायाला बोलावतं. याया पण विचार करतो आणि काळू कावळयाला मदत करायला सांगतो.

काळू कावळा फार प्रेमळ आणि हुषारही असतो. तो थोडा विचार करतो आणि यायाला म्हणतो "आपण एकएकटे काही मदत करु शकणार नाही. तेव्हा असं करुयात.."

"मी त्या माणसाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेतो त्याच्या जवळून उडत जाऊन. आपण उंदिर मामाचीही मदत घेऊयात. त्या मिंटू उंदराला सिंहाला जाळ्यातून सोडवण्याचा अनुभव आहेच. मी त्या माणसाला माझ्या मागे यायला लावून दूर नेईन. तोपर्यंत मिंटू त्यांना जाळ्यातून सोडवेल. तुम्ही दोघं माश्यांना निरोप द्या की आणि डॉल्फिन माशांना किनार्‍याजवळ बोलवून ठेवा. म्हणजे मिंटूने जाळं तोडल्या तोडल्या ते तिघेही डॉल्फिन्स वर बसून त्यांच्या घरी वेगाने जातील. अगदीच त्रास द्यायला लागला तो माणूस तर मी आणि चिमणी ताई मिळून त्याला चोच मारुन हैराण करु."



काळू कावळ्याची ही योजना ऐकून यायाला खूप आनंद होतो. आणि ठरल्याप्रमाणे सगळ घडून येऊन बार्बी आणि तिचे आई बाबा राजवाड्यात सुखरुन परत जातात.



थोड्याच दिवसात राजा खूप सारे मोती भेट म्हणुन याया, काळू, चिऊताई, मिंटू आणि डॉल्फिनला राजपत्रासोबत पाठवून धन्यवाद देतो आणि आपली मैत्री अशीच राहुदे अशी प्रार्थना करतो.

गोष्टीची गोष्ट

"आई, गोष्ट सांग ना!"



"एका गावात एक लाकुडतोड्या रहात असतो.."


"आSS ती नक्को, ती माहितेय मला"


"बर, मग भोपळ्यात बसणार्‍या म्हातारीची सांगते"


"नSक्कोSS"

"मग सांगू तरी कोणती?"

"रच्चून सांग"

"बर मग तुच सांग कोणती हवी?"

"फुलपाखराची सांगू?"

"चालेल" फुललेल्या चेहर्‍याने तिने होकार दिला आणि आमची गाडी पुढे सरकली.


"एका गावात फुलपाखर रहात असतात. अSSअ अ गावाचं नाव काय बर ठेवूयात? ते फुलातला मध खातात ना!मग मधुशाला ठेवुयात?"


"नक्को, त्यापेक्षा आपण आंबेगाव ठेवुयात. म्हणजे आंबे तरी खातील"


हसू दाबत मग गावाचं नामकरण होतं "आंबेगाव"


"तर त्या आंबेगावात फुलपाखरं रहात असतात."


"१००० आई १००० फुलपाखरं असतात"


"बर, त्या आंबेगावात हजार फुलपाखरं रहात असतात. त्यातल्या एकाच नाव असतं याया"


"हिहि! याया? चालेल"

"त्या यायाच्या आईचं नाव असतं.."


"आSSई, आSSई तिच नाव सिमा नाहितर सिमिन.. आणि"


"बर, तर आंबेगावात हजार फुलपाखर रहात असतात तिथेच या यायाच पण घर असतं. याया सकाळी उठून भराभर आवरुन शाळेत जात असतो.."


"आSSई, आSSई त्याची शाळा कशी असेल? त्याला ना शाळेत मध गोळा करायला शिकवत असतील. हो ना?"

"बरोब्बर, तर हा याया आणि त्याचा मित्र जाजा रोज सकाळी उठून शाळेत जात असतात मध कसा गोळा करायचा ते शिकायला"


"आSSई,आSSई "जाजा" नको"

"मग?"


"त्याच पण नाव यायाच ठेवूयात."


"अग, पण मग कळणार कसं कोण कोण आहे ते?"

"कळेल की, एक "याया कुलकर्णी असेल आणि एक याया जोशी" आमच्या वर्गातल्या इशान सारखा"

"खर्रच की, माझ्या हे लक्षातच नाही ह आलं"


"तर हे दोन्ही याया एकमेकांचा हात धरुन शाळेत जात असतात. एकदा काय होतं मधल्या सुट्टीत आईने दिलेला खाऊ खाऊन.."


"हॅ खाऊ नाही खात शाळेत. शाळेत पोळी भाजी खातात नाहीतर उपमा, पोहे खातात. जंक फुड इज नॉट अलाऊड इन स्कूल" "त्यांना देत नाहीत का टिफिन शाळेतूनच?"


"नाही ग त्यांची शाळा वेगळी आहे ना! विद्यानिकेतन मधे तुला देतात टिफिन पण विवेकानंद मधे कुठे द्यायचे?"


पटल पटल अशी मान डोलावली तिने आणि आमची गोष्ट परत एकदा याया कडे वळली.


मग गोष्टीत याया कुलकर्णी कसा वाट चुकतो, एका राक्षसाच्या घरात शिरतो. मग तो सिमिन आई सिमिन आई अस हाका मारत रहातो मदती साठी. घाबरुन राक्षसाच्या घरातल्या खिडकीला लावलेल्या ग्रील वर जाऊन बसतो.आणि तेव्हढ्यात तिथे एक छोटी राक्षसिण येते.


बाSSपरे! याया घाबरतो.

ती राक्षसिण त्याच्या जवळ जाते.


तो उडायचा प्रयत्न करतो पण घाबरल्यामुळे त्याला उडताच येत नसतं. तो फुलपाखरी भाषेत सांगत असतो "पकडू नको, मारु नको" पण ते राक्षसिणीला काही समजतच नसतं. तिला नुसतीच गुणगुण ऐकू येत असते. ती त्या फुलपाखराला पकडते. तो पंख सोडवून उडायचा प्रयत्न करतो तर त्याच्या पंखांचा थोडा रंग तिच्या बोटांना लागतो. ती त्याला स्वतःच्या तळहातावर ठेवते आणि मग खिडकी बाहेर हात काढून तशीच उभी रहाते. तेव्हा कुठे त्याला कळतं "ही चांगली राक्षस आहे. आपल्याला बाहेर पडायला मदत करतेय."


तो लगेच उडतो. परत जाण्यापुर्वी मागे वळून तिला थँक्स म्हणतो. तिला फक्त गुणगुण ऐकू येते पण तिला कळत त्या फुलपाखराला खूप आनंद झालाय. ती हे सांगायला घरात जाते. आणि आईच्या पदराला धरुन म्हणते "आई, परत कधी येईल ते फुलपाखरु आपल्याकडे?"


इकडे याया जोशी घाबरत याया कुलकर्णीच्या घरी पोहोचतो आणि काका काकुंना याया हरवल्याच सांगतो. सगळे काळजीत पडतात. सगळे इकडे तिकडे शोधायला लागतात. सिमिनला खूप काळजी वाटते. रडूही येतं. ती फुलपाखरेश्वराला हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते "हे फुलपाखरेश्वरा माझ्या यायाचं रक्षण कर त्याला वाईट राक्षसांपासून वाचव."

सगळे शोधत शोधत पुर्ण शहर पालथ घालतात. शेवटी त्यांना एका घराबाहेरुन उडत आलेला याया दिसतो तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव येतो. सिमिन तर त्याला कुशीत घेऊन रडते आणि पुन्हा असं कुठे हात सोडून जाऊ नकोस म्हणून रागावतेही.


याया सिमिनला त्या छोट्या आणि प्रेमळ राक्षसिणी विषयी सांगतो. तेव्हा त्याला आई कडून कळतं की ह्या राक्षसांच्या वस्तीत काही राक्षस फुलपाखरांच्या पकडून त्यांच्या पायाला दोरी बांधतात नाहीतर त्यांना काचेच्या बाटलीत बंद करुन ठेवतात. त्यांच्या चुलत भावा बहिणींना म्हणजे चतुर आणि टाचणीला पण हे राक्षस छळतात. पण काही राक्षस ह्या छोट्या राक्षसिणीसारखे प्रेमळही असतात.


"आई, मी कधीतरी त्या छोट्या राक्षसिणीच्या घरी जाऊ खेळायला?"


"जा पण मी किंवा बाबा बरोबर असताना"


"थँक यू आई"

याया अधून मधून सानिकाशी खेळायला जात असे. मस्त वेलीवर बसून झोके घ्यायला आणी तिच्या हातावर जाऊन ती काय चित्र काढतेय काय अभ्यास करतेय ते बघायला त्याला खूप आवडायचं

असेच बरेच दिवस जातात. त्या आंबेगावात कधी नव्हे त्या मारामार्‍या नी चोर्‍या व्हायला लागतात.


"आई, मारामार्‍या नकोत ग. मला नाही आवडत" इति लेक


"बर, आधी ऐक तर का होतेय मारामारी ते" गोष्ट सांगणारी मी


"ठिक आहे" म्हणत राजी झालेली ती


तर त्या आंबेगावात कधी नव्हे त्या मारामार्‍या नी चोर्‍या व्हायला लागतात.कारण काय? फुलपाखरे १००० आणि फुलं, झाडं किती? तर १०


मग त्यांच्यात मारामार्‍या कोणी कोणत्या फुलातला मध गोळा करायचा त्यावरुन. काही जण तर दुसर्‍याने गोळा करुन ठेवलेला मध हळूच चोरायचे ते कामावर गेले की. मग परत त्यावरुन मारामार्‍या. रोज कोणी ना कोणी पंख फाटला म्हणून फुलस्पितळात अ‍ॅडमीट. काही नाही तर जखमांवर उपचाराला ही भली मोठी रांग फुलखान्यात. एक दिवस ह्या सगळ्यावर उपाय काय ह्यावर चर्चा करण्यासाठी सिमिन आणि मोलू सगळ्या आंबेगावकरांना गावातल्या वेलीवर बोलावतात. त्यात सगळे आधी भांडतच बसतात. मग कोणीतरी म्हणत ह्यावर उपाय काय? असच भांडत बसलो तर आपण सगळेच अ‍ॅडमिट होऊ हातपाय मोडून.


मोठ्यांच्या मिटिंग बरोबर छोट्यांची पण एक मिटिंग भरते. त्यात याया सगळ्यांना सांगतो, "आई बाबांनी सांगितलय मला की फुलं, झाडं कमी आहेत म्हणून ही सगळी मारामारी होतेय्.दुसरी गाव शोधत बसण्यात सगळ्यांचीच शक्ती जाईल. मग असं केलं तर? आपण टिम पाडून


कामं वाटून घेऊयात. काही जणं दुसरी गावं शोधतील. काही आहे त्या फुलांवरुन मध गोळा करुन सगळ्यांना वाटतील तर काही जण चांगल्या राक्षसांना झाडं लावायला सांगतील."


"याया, अरे चांगली कल्पना आहे पण त्यांच्यातल्या चांगल्या राक्षसांना शोधणार कस?" यायाचा दुसरा मित्र जाजा त्याला विचारतो.


"अरे! एक छोटी प्रेमळ राक्षसिण माझी मैत्रिण आहे सानिका नावाची. ती करेल ना आपल्याला मदत"


"चालेल, मग आपण हे सगळं मोठ्यांना सांगुयात आणि आजच कामाला लागुयात"


आई बाबाच नाही तर संपुर्ण आंबेगावाला ह्या छोट्या फुलपाखरांचंकौतुक वाटतं. ते तसच करायचं ठरवतात.सानिकाला भेटायला याया आणि त्याच्या मित्र मैत्रिणींची टिम निघते.


इकडे सानिकापण आईला प्रश्न विचारुन हैराण करत असते. "आई, कधी परत येईल ग ते फुलपाखरु माझ्याशी खेळायला?" तितक्यात ग्रिलवर फुलपाखरच फुलपाखर येउन बसलेली तिला दिसतात. ती आनंदाने ओरडत त्यांच्याकडे पळते. त्या आवाजाने घाबरुन जाजा यायाचा हात घट्ट पकडून ठेवतो. पण याया त्याला हसत हसत धीर देतो.


याया उडत उडत सानिकाच्या हातावर जाऊन बसतो.आता त्या दोघांना एकमेकांची भाषा थोडी थोडी कळायला लागलेली असते. याया तिला त्यांच्या गावातल्या मारामार्‍या, झाडांच प्रमाण वगैरे सांगतो आणि तिला ती सगळ्या चांगल्या राक्षसांना झाडं लावायला सांगेल का ते विचारतो.


ती पण आनंदाने तयार होते आणि लगेच जाऊन आईला झाडं लावायचेत म्हणून सांगते.


फुलपाखरांना पण आनंद होतो. सानिकाने लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर बसून ते आपला आनंद व्यक्त करतात.


शाळेत गेल्यावर सानिका तिच्या सगळ्या मैत्रिणींना भक्तीला, रुचाला, श्रावणीला, केशवला, इशानला, आदित्यला ही फुलपाखरांची गोष्ट सांगते आणि त्यांनाही झाडं लावायला सांगते.


इथे आमची आजच्या दिवसाची गोष्ट संपते आणि दुसर्‍या दिवसासाठीची डिमांड आधीच नोंदवली जाते "आई, उद्या पिंकू परी हवी हा गोष्टीत..तिच्या कडे उडत जाणारं विमान हवं, झोपाळा हवा, चॉकलेटची झाड आणि आयस्क्रिमच कारंजं हवं..."