Friday, June 25, 2010

आटपाट नगरी

ऐक बाळा! तुझ्या साठी रचली कहाणी
आटपाट नगरा मधे रहात होती राणी

आवडायाचे तिला तिथले खळाळते पाणी
खळाळत्या पाण्यासह म्हणायची गाणी

गोड गोड गाणी गात ती चालायची वाट
आवडत मुळ्ळी नव्हता तिला उगा थाटमाट

राणी सारखाच होता अगदी; आटपाटचा राजा
कामाचा ना केला त्याने कध्धी गाजावाजा

आटपाट नगरामधे सारेच होते गोड
कध्धी नाही काढायाचे कुणाचीही खोड

आवडेल का ग फिरायला आटपाट नगरीत?
पण जायच्या आधी शिकून घ्यावी लागेल तिथली रीत

चालत नाही मारामारी, ना हेवेदावे काही
उगा कुरापत करु पहायाची नाही

फुलपाखराला पकडलं तर शिक्षा होते भारी
शिक्षा म्हणून कट्टी घेतात आटपाटची सारी

हे सारे नियम पाळतात राणी आणि राजा
म्हणून तर नियम पाळते इथली सारी प्रजा

अशी आहे आटपाट नगराची कहाणी
आवडले का आटपाटचे राजा आणि राणी?

1 comment:

  1. sagalya kavita chhan ahet ..... muktachhandavarun chhandavar kadhi alis ?

    ReplyDelete